औरंगाबाद - राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी शहरात ग्राहक बनून एका दुकानात स्टिंग ऑपरेशन केले. शेतकरी बनून गेलेल्या भुसे यांनी दुकानदाराला युरियाची मागणी केली. मात्र, दुकानदाराने उपलब्ध असुनही युरिया नसल्याचे सांगितले. यानंतर भुसेंनी दुकानदारावर कारवाई करत गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. राज्यभरातील कृषी दुकानदारांनी शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचीच खते, बियाणे घेण्याची सक्ती करू नये, शिल्लक असतानाही युरिया शेतकऱ्यांना न देणे या बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत, अशा इशाराही कृषिमंत्र्यांनी दिला आहे.
औरंगाबाद येथे युरिया मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेत कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज (रविवारी) दुपारी औरंगाबाद शहराला अचानक भेट दिली. जिल्हा यंत्रणेला न कळवता ते थेट बाजार समितीच्या आवारातील नवभारत फर्टीलायझर या दुकानात स्वत: कृषिमंत्री सामान्य शेतकरी म्हणून गेले. त्यांनी दुकानदाराकडे १० गोणी युरिया मागितला. त्यावर युरिया शिल्लक नसल्याचे दुकानदाराने सांगितले. १० ऐवजी पाच गोण्यांची मागणी केल्यावरही दुकानदाराने युरिया दिला नाही.