मनसे नेत्याची पोस्ट करण्याविरोधात टीका छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : राज्यात औरंगजेबाच्या नावाने राज्यात वातावरण खराब झाले असताना एका व्यक्तीने चक्क औरंगजेबाचा राज्याभिषेक सोहळा साजरा करा अशी पोस्ट समाज माध्यमांवर टाकली. त्यानंतर पुन्हा नव्या वादाची ठिणगी पडली आहे. मनसे पदाधिकारी चंद्रकांत नवपुते यांनी याबाबत सिडको पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अताऊर रहेमान पटेल असे आरोपीचे नाव आहे.
कोल्हापुरात पोस्टरमुळे वाद झाल्यानंतर दंगल झाला. त्यानंतर औरंगजेबाचा राज्याभिषेक धुमधडाका साजरा करण्याची पोस्ट केली. औरंगजेब हा क्रूर होता. कशाला राज्याभिषेक साजरा करायचा? धार्मिक तेढ वाढविणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत- मनसे विभागप्रमुख चंद्रकांत नवपुते
सोशल मीडियावर पोस्ट करताना सावधान:गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या नावाने राजकारण तापत आहे. यात अनेक सामाजिक संघटनांनी उडी घेत सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट टाकल्याने सामाजिक वातावरण खराब होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. कोल्हापूरसह राज्यात इतर ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. त्यामुळेच समाज माध्यमांवर पोस्ट टाकताना सावधान रहा, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. सामाजिक तेढ निर्माण होतील अशा पोस्ट टाकल्यास गुन्हा दाखल होऊन शिक्षा देखील होईल. त्यामुळे समाज माध्यमांवर वादग्रस्त पोस्ट टाकू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. समाजात तेढ वाढविणारी पोस्ट टाकल्यामुळे पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी तणावाची स्थिती- राज्यात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. त्याच दिवशी कोल्हापुरात आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर दंगल झाली. त्यापाठोपाठ अहमदनगर, धुळे व बीड अशा विविध जिल्ह्यांत औरंगजेबाचे समर्थन करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे त्या ठिकाणी हिंदू संघटनांनी विरोध केला आहे. कायदा व सुव्यस्था टिकविण्यासाठी पोलीस यंत्रणेवर ताण आला. त्यामुळे सामाजिक एकतेला सुरुंग लावण्यासाठी काही समाज कंटक प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. धार्मिक तेढ वाढविण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रोत्साहन मिळत असल्याची यापूर्वी राज्यातील विरोधी पक्षांनी टीका केली आहे.
हेही वाचा-
- कोल्हापूर पूर्वपदावर, सर्व व्यवहारांसह तब्बल चाळीस तासानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत
- Owaisi on Kolhapur Riots: मग गोडसे कुणाची औलाद... ओवैसींचा देवेंद्र फडणवीसांना खोचक सवाल
- Communal Violence In Maharashtra : महाराष्ट्रात सातत्याने होतो आहे जातीय हिंसाचार, 2023 मध्ये घडल्या 'या' मोठ्या घटना