औरंगाबाद- काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांना भाजप प्रवेश देऊ नये या मागणीसाठी सिल्लोडच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. अब्दुल सत्तार यांना जर भाजपात प्रवेश दिला तर सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदार संघातील भाजप पदाधिकारी राजीनामा देतील, असा इशारा यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला.
सुनील मिरकर, भाजप पदाधिकारी भाजप पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यात आपल्या बैठकीचे प्रमुख मुद्दे मांडले आहेत. याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भेट घेऊन आपल म्हणणे मांडले होते.
औरंगाबादचे सिल्लोड मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेत लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केले. अब्दुल सत्तार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे सत्तार यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. सत्तार यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेने सिल्लोड विधानसभा मतदार संघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी सत्तार यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला. सिल्लोड येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी सत्तार यांना प्रवेश देऊ नका, असा निर्णय घेतला आहे.
अब्दुल सत्तार यांनी आमदार असताना भाजप पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. अशा व्यक्तीला भाजप प्रवेश देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. जर अब्दुल सत्तार यांना भाजप प्रवेश दिला तर सिल्लोड-सोयगाव येथील भाजप पदाधिकारी पक्ष सोडतील, असा इशारा या बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला.