औरंगाबाद- एका राष्ट्रीय दुरचित्रवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केली आहे. गोस्वामी यांनी पुराव्याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्र्यांवर बेछुट आरोप केल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करावी मागणीचे निवेदन शिवसेनेच्यावतीने पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना देण्यात आले. अर्णब गोस्वामी यांच्या वाहिनीवरुन खळबळ पसरवणाऱ्या बेजबाबदार बातम्या प्रसारित करुन समाजात तेढ निर्माण केला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
अंबदास दानवे, आमदार शिवसेना पत्रकारितेच्या नावाखाली गोस्वामी यांची वाहिनी सतत बेजबाबदार बातम्या प्रसारित करत आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांवर बेछुट आरोप करण्यापर्यंत अर्णब गोस्वामी यांची मजल गेली आहे. बातम्या प्रसारीत कताना यापुर्वी देखील गोस्वामी यांनी राजकीय नेत्यांचा उल्लेख करताना अश्लाघ्य शब्द वापरले आहेत. त्यामुळे नेत्यांचे चारित्र्यहनन झाले. गोस्वामी यांच्याविरुध्द यापुर्वी देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका मृत महिलेबाबत आरोप करताना त्यांनी पत्रकारितेची सीमा ओलांडली होती. त्या मृत महिलेची विटंबना आणि चारित्र्यहनन त्यांच्याकडून घडले आहे. महिलेच्या पालकांनी अशा अशोभनीय बातम्यांबद्दल आक्षेप घेतला होता, असे निवेदनात म्हटले आहे.
प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाने पत्रकारितेबाबत व बातम्या प्रसारीत करण्यासंदर्भात काही मर्यादा आखल्या आहेत. मात्र, ही वाहिनी व विशेषत: गोस्वामी हे अत्यंत वाईट पध्दतीने आचारसंहितेचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेस कॉन्सिलने दिलेल्या कलम २५ व ३५ चे वाहिनीने उल्लंघन केले आहे. काही जणांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी गुन्ह्यासंदर्भात बेजबाबदार बातम्या खळबळजनकरित्या प्रसारित करुन गोस्वामी हे समाजात तेढ निर्माण करत आहेत. लोकांना चिथावणी देण्याचे काम करत असल्याने राज्यात कायदा व सुव्यस्थेचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कुठलाही पुरावा नसताना बातम्या प्रसिध्द करणे त्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकृत यंत्रणेच्या कामात अडथळा आणू शकतो. त्यामुळे ख-या गुन्हेगाराला सुरक्षितस्थळी पळविण्यासाठी मदत होते, असा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आले.
पोलीस खात्याचाही वाहिनीने वेळोवेळी अपमान केला आहे. एवढ्यावरच न थांबता राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करुन धमकावले आहे, असे वागताना त्यांची देहबोली अतिशय आक्षेपार्ह व संतापजनक असते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र गोस्वामी यांच्यावर कारवाई करण्याची वाट पाहत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी आणि सुशील खेडकर यांची उपस्थिती होती.