औरंगाबाद - शिवसेनेच्या वतीने राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या नावाच्या जयघोषाला विरोध केल्याने शिवसैनिकांच्या भावना दुखवल्याचे आमदार डॉ. अंबादास दानवे व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.
शिवसेनेच्या वतीने औरंगाबादच्या क्रांतिचौक भागात व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार डॉ. अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले, बाळासाहेब सानप यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. कोणतेही चांगले काम करताना सर्वसामान्य मराठी माणसाच्या तोंडातून महाराजांचा जयघोष निघाल्याशिवाय राहणार नाही. त्यात महाराजांच्या वंशजांनी जयघोष केला तर कुठे बिघडले, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. ज्या महाराजांचे नाव घेऊन निवडणुकीत प्रचार केला. त्याच महाराजांचे नाव घेतल्यावर भाजपला त्रास होतोय का? महाराजांचे नाव नुसते निवडणुकीपूरते घेतले होते का?, असा प्रश्नही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला.