औरंगाबाद - गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष दोन पावले मागे आला आहे. निशाणा अचूक बसतोय. कधी कधी दुसऱ्याची बंदूकही वापरावी लागते. बंदूक कोणाचीही असू दे, त्यातील दारू आपली आहे. निशाणा बरोबर लागणे महत्त्वाचे आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच आपण पुढून हल्ला करतो पाठीत खंजीर खुपसणार नाही, असेही ते म्हणाले. औरंगाबादेत शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार राऊत यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते
संजय राऊत यांची विरोधीपक्षांवर जोरदार टीका नांदेडचा देगलूरला काय झालं, सगळ्यानी पाहिलं, दादरा नगर हवेली तिथं आपण जिंकलो, मोदींच्या राज्यात आपण घुसलो, आपण राज्य बाहेर उशिरा गेलो. पण पाऊल दमदार पडतंय, आता आपण गुजरातला जाऊ, आणि देशही पादाक्रांत करू, या देशाचे नेतृत्व एक दिवस उद्धव ठाकरे करतील, असा विश्वास संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात व्यक्त केला. औरंगाबादेत ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर फटकेबाजी केली.
संभाजी नगर शिवसेना महाराष्ट्रासाठी आदर्श -
महापालिका निवडणूक जवळ आल्या आहेत. महाराष्ट्रात काहीही झालं तरी चालेल. मात्र, मुंबई आणि औरंगाबाद आपल्याकडे हवे, शिवसेना शहराची गरज आहे, इथं शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळायला हवे, महाविकास आघाडी आहे चिंता नाही, खैरे महापालिका येईल. मात्र. तुम्हीही लोकसभेत दिसावे पुन्हा आमची इच्छा आहे, असे राऊत म्हणाले.
पत्रकार आपले लाऊड स्पीकर -
विमानतळावर आलो पत्रकार बाहेर उभे, यांना शिवसेनेबाबत आकर्षण आहे, मी जिथं जाईल तिथे मीडिया असतो, शिवसेनेला लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचेही योगदान आहे, ते नसते तर आपलं सरकार आलं नसत. 2 वर्षांपूर्वी मी सकाळी उठायचो त्यांना भेटायचो आणि सांगायचो मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार, 33 व्या दिवशी झालं हे, ते आपले लाऊड स्पीकर आहेत. असे राऊत म्हणाले.
शिवसेना राष्ट्रीय स्वप्न पाहतीयं -
औरंगाबादेत लोकसभा निवडणुकीत अपघात झाला, तो बघायला हवा, महाविकास आघाडी सोबत शिवसेना म्हणूनही आपल्याला विचार करावा लागेल भाजपच्या अनेकांनी पहाटे कोट शिवले,चढवले, मात्र आम्ही ते उतरायला लावले. शिवसेना आता पूर्वीची राहिली नाही, आता आपण राष्ट्रीय स्वप्न पाहतोय त्यामुळं आपण आता मन मोठं केलं पाहिजे आणि त्यात सगळ्यांना सामावून घेतले पाहिजे. मुंबई ठाण्यानंतर कुठं ठिणगी पडत असेल तर ती औरंगाबादेत पडते, इथला शिवसैनिक मनातून काम करतो, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.