औरंगाबाद- पैठण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संजय वाघचौरे यांची उमेदवारी रद्द झाल्याने त्यांना निवडणुकीला मुकावे लागणार आहे. तांत्रिक चूक असली तरी संजय वाघचौरे यांनी प्रचारातून पाय काढून घेतल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे
हेही वाचा - लासुर येथील अमित शाह यांची जाहीर सभा रद्द
संजय वाघचौरे यांनी राष्ट्रवादीकडून तर दत्ता गोरडे यांनी राष्ट्रवादी आणि अपक्ष असे दोन फॉर्म भरले होते. ऐनवेळी दत्ता गोरडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि एबी फॉर्म मिळवत पैठणला प्रचार सभा घेतली. आपल्याला एबी फॉर्म न मिळाल्याने संजय वाघचौरे आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना झाले. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनीही एबी फॉर्म आणला. संजय वाघचौरे आणि दत्ता गोरडे दोघांनाही एबी फॉर्म मिळाल्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच संभ्रम निर्माण झाला. नेमका उमेदवार कोण? हेच समजत नव्हते. चार दिवस चाललेल्या या नाट्याला पैठणचे निवडणूक अधिकारी यांनी विराम दिला आहे. निवडणूक अधिकारी यांनी दत्ता गोरडे यांचा एबी फॉर्म ग्राह्य धरला तर संजय वाघचौरे यांचा अवैध ठरवला. निराश झालेले संजय वाघचौरे यांनी त्वरित न्यायालयात धाव घेत आव्हान केले. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याने सध्या दत्ता गोरडे हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रचार करत आहेत. अशा परिस्थितीत संजय वाघचौरे यांनी पूर्णपणे स्वतःला प्रचारातून बाहेर ठेवले आहे. त्याविषयी ई टीव्ही भारतशी बोलताना ते म्हणाले की मोठ्या नेत्यांनी मला प्रचारासाठी बोलावले तर मी नक्कीच जाईल.
हेही वाचा - पैठण तालुक्यात महिलेची पेटवून घेत आत्महत्या