औरंगाबाद - महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहराच्या विविध भागात डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून मनपा मुख्यालयासमोर चक्क डुक्कर भेट देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले.
औरंगाबाद : पर्यटन राजधानीत डुकरांचा सुळसुळाट, आरपीआयने मनपाला दिले वराह पिल्लू भेट
औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. या डुकरांमुळे येथील नागरिक आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून मनपा मुख्यालयासमोर चक्क 'डुक्कर' भेट देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले.
आरपीआयचे मराठवाडा युवा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी मनपा आयुक्तांसह महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पहादसिंगपुरा, बेगमपुरा, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असलेल्या बुद्धलेणी, जगप्रसिद्ध बिबीका मकबरा परिसरासह शहराच्या विविध भागात डुकरांचा सुळसुळाट झाला आहे.
पर्यटनस्थळ पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. अशा वेळी ही डुकरे पर्यटकांच्या अंगावर धावून येतात. मनपाचे नियम डावलून शहरात अवैधरित्या 'डुक्कर पालन' सुरू आहे. हे त्वरित थांबवावे. अन्यथा येत्या काळात महापौर आणि मनपा आयुक्तांच्या घरात डुक्कर सोडण्यात येईल, अशा इशाराचे निवेदन मनपा उपायुक्त रवींद्र निकम यांच्याकडे आरपीआयच्यावतीने देण्यात आले.