औरंगाबाद - मुलीला शाळेतून माघारी आणण्यासाठी गेल्याची संधी साधून चोरट्याने अवघ्या पाऊण तासात घर फोडी केल्याची घटना घडली. ही चोरी शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील शहानुरवाडी भागात घडली. चोरट्याने तीन तोळ्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबविली.
औरंगाबादमध्ये भर दिवसा झाली घरफोडी , तीन तोळ्यासह रोख रक्कम लांबविली - midc
शहानुरवाडी भागातील महिला दुपारी दोनच्या सुमारास घराला कुलूप लावून मुलीला शाळेत आणण्यासाठी गेली होत्या. याची संधी साधून चोराने घराचे कुलूप तोडले.
चिखलठाणा एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत उमेश भय्याजी पोकळे (४६, रा. शहानुरवाडी) कामावर गेले होते. तर त्यांच्या पत्नी दुपारी दोनच्या सुमारास घराला कुलूप लावून मुलीला शाळेत आणण्यासाठी गेल्या होत्या. याची संधी साधून चोराने घराचे कुलूप तोडले. आत शिरुन चोराने कपाटातील सोन्याचे दागिने, मंगळसूत्र आणि रोख रक्कम असा ऐवज लांबविला.
तीनच्या सुमारास मुलीला घेऊन घरी पोहोचल्यावर घरफोडी झाल्याचे पोकळे यांच्या पत्नीच्या निदर्शनास आले. या चोरी प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत पाचोळे करत आहेत.