औरंगाबाद - प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते पोलीस आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण सोहळा पार पडला. या प्रसंगी देसाई यांनी शहिदांना मानवंदना दिली. पोलीस परेड मैदानात पोलिसांचे पथसंचालन पार पडले. मागील एका वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यसरकारने उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.
वर्षभरात सरकारची उल्लेखनीय कामगिरी - सुभाष देसाई - औरंगाबाद पालकमंत्री सुभाष देसाई
प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते पोलीस आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण सोहळा पार पडला. या प्रसंगी देसाई यांनी शहिदांना मानवंदना दिली.
बालविवाह चिंतेची बाब
मागील वर्षभरात बालविवाह थांबण्यात निश्चित अपयश आल्याचे मत सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. औरंगाबाद जिल्ह्यात मागील वर्षभरात 21 बालविवाह झाले. ही चिंतेची बाब असून बालविवाह थांबण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य देखील त्यामध्ये मदत करायला हवी. काही प्रमाणात बाल विवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आले असले तरी बालविवाह थांबण्याचे मोठ आव्हान भविष्यात निर्माण होत आहे असे सुभाष देसाई यांनी भाषणात सांगितले.
कोरोना काळात रोजगार टिकवण्याचे प्रयत्न
कोरोनाच्या कठीण प्रसंगी नियमांचे पालन करत रोजगार टिकवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले. विशेषत: औरंगाबाद शहरात असलेल्या औद्योगिक वसाहतीत नवीन प्रकल्प यायला सुरवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या सामंजस्य करारात औरंगाबाद येथील नवीन उद्योगांचा समावेश आहे. नुकतेच शेंद्रा औद्योगिक वसाहतीत एका रशियन स्टील कंपनीसाठी 44 एकर जागा देण्यात आली आहे. त्यात एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन हजारो बेरोजगारांना रोजगार मिळेल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद शहराला मिळेल नवी ओळख
औरंगाबाद ही पर्यटन नगरी असून युवा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष काम करत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून पर्यटनाला चांगलीच चालना मिळणार असून पर्यटनात आघाडीचा जिल्हा म्हणून शहराला ओळख मिळेल असा विश्वास आहे. शहरात गेल्या एक वर्षांमध्ये झालेल्या रस्त्यांच्या कामामुळे अपघात आणि अपघातातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकार्यांचे विशेष कौतुक केले आहे. नवीन जल योजनेमुळे प्रत्येकाच्या घरात नळाला पाणी येईल आणि जिल्ह्याची चौफेर प्रगती होईल असे मत सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं.
औरंगाबाद जिल्हा लवकरच होईल कोरोना मुक्त
कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत घालून दिलेल्या नियमांचे पालन आपल्याला करावा लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाला हरवण्यात यश येत असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्या काही दिवसात मृत्यू दर कमी करण्यात यश मिळाले असून लवकरच मृत्यूदर शून्य होईल असे प्रयत्न केले जात असून त्यात निश्चित यश मिळेल असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.