औरंगाबाद-संभाव्य कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने, संतप्त नातेवाईकांनी महिला डॉक्टरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली. ही घटना बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एमजीएम रुग्णालयात घडली आहे. या घटनेने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
एमजीएम रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाण रुग्ण दगावल्याची वार्ता समजल्यावर, रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय गाठले आणि रुग्णालयाच्या कोविड आयसीयू वार्डात मोठ्याने गोंधळ घालायला सुरुवात केली. मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या साहित्याची तोडफोड केली. इतकेच नाही तर रुग्णालयातील महिला डॉक्टरला देखील त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी एमजीएम रुग्णालयाने सिडको पोलिसात तक्रार दिली असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयामध्ये एका रुग्णाला बुधवारी रात्री सातच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने रात्री नऊच्या सुमारास त्यांना विशेष कक्षात हलवण्यात आल. रुग्ण दखल झाला त्यावेळी त्यांच्या प्रकृतीकडे बघता त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा, असा संशय डॉक्टरांना आल्याने. त्या पद्धतीने त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, रात्री साडेदहा नंतर रुग्णाची प्रकृती खालवायला सुरुवात झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
मृत रुग्णाच्या कुटुंबियांना या याबाबत माहिती देण्यासाठी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. मात्र, रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी त्यांचा संपर्क झाल्यावर आम्ही त्यांना पूर्ण कल्पना दिली होती. तरी देखील त्यानंतर त्यांच्या नातेवाईक रुग्णालयात आले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली, असे डॉ. राघवन यांनी सांगितले. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत, त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ घालत तोडफोड केली. इतकेच नाही तर रुग्णालयातील महिला डॉक्टरला देखील त्यांनी मारहाण केली. त्यानंतर तातडीने पोलिसांना बोलावले आणि तक्रार दिली असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली. मात्र, या घटनेनंतर डॉक्टरांचे मनोबल खचले असल्याची माहिती एमजीएमचे डॉ. राघवन यांनी दिली आहे. या प्रकरणी सिडको पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास पोलीस करत आहेत.