औरंगाबाद- मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यात आमदार-खासदारांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. औरंगाबादमध्ये मात्र हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. आंदोलनाआधीच काही मुख्य समन्वयकांना कोरोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
माहिती देताना समन्वयक सुनील कोटकर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदारांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. शिक्षणात आणि नोकरीत मराठा आरक्षणावर असलेली स्थगिती उठवावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात येणार होते. तथापि, औरंगाबादमध्ये हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी, आठ ते दहा दिवसांत पुन्हा एकदा नव्याने आंदोलनाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक अप्पासाहेब कुडेकर आणि समन्वयक सुनील कोटकर यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण याचिका ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग केली आहे. मात्र, त्याचवेळी राज्यात नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयानंतर राज्यात विविध ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी सरकारविरोधात आंदोलने केली. इतकेच नव्हे तर, काही ठिकाणी युवकांनी आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. या सर्व आंदोलनांची पुन्हा नव्याने रुपरेषा ठरविण्यासाठी औरंगाबादमध्ये राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आजपासून राज्यातील सर्वच आमदार, खासदारांच्या घरासमोर 'ढोल बजाव' आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती.
तसेच, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही, असा आरोप करण्यात आला होता. सरकार झोपेचे सोंग घेत असून, त्यांना झोपेतून उठवण्यासाठी 'ढोल बजाओ' आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, आंदोलनाच्या एक दिवस आधीच मराठा क्रांती मोर्चातील काही मुख्य समन्वयकांना आणि काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. गेल्या आठ दिवसांपासून सर्वच समन्वयक आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी एकत्रित काम करत होते. त्यामुळे आंदोलन करायला मुख्य समन्वयकच नसल्याने जिल्ह्यातील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा-कोरोनाचा उद्रेक वाढला : ना बेड शिल्लक.. ना व्हेंटिलेटर... रुग्ण आता वेटिंगवर