औरंगाबाद- विठुरायांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याची आख्यायिका असलेला छोटा पंढरपूर म्हणून औरंगाबादच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराची ओळख आहे. या मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे.
औरंगाबादमधील छोट्या पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त जय्यत तयारी - मराठवाडा
छोटा पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे.
रुक्मिणी माता रुसून गेल्यावर त्यांच्या शोधात भगवंत पांडुरंग छोट्या पंढरपूरला आले होते. याच ठिकाणी रुक्मिणी माता आणि पांडुरंगाची भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी मोठ्या पंढरपूरकडे प्रस्थान केले होते, अशी या मंदिराची अख्ययिका आहे. त्यामुळे या छोट्या पंढरपूरला अधिक महत्व आहे, असे पुजारी पांडुरंग कुलकर्णी यांनी सांगितले.
मराठवाड्यात छोटा पंढरपूर म्हणून प्रसिद्ध वाळूज औद्योगिक वसाहतीतील विठ्ठल रुक्मिनी मंदिरात पंचक्रोशीतील लाखो भाविक आषाढी एकादशीनिमित्त येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच जिल्हाभरातील आणि जिल्ह्याबाहेरील ५ ते १० पालखी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी याठिकाणी येत असतात. मागील वर्षी अडीच ते तीन लाख भाविक या ठिकाणी आले होते. या वर्षी ही संख्या वाढण्याची शक्यता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी वर्तविली आहे. त्यामुळे अनुषंगाने मंदिर प्रशासनाने तयारी सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.