छत्रपती संभाजीनगर : ऐन रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमधील शांततेला गालबोट लागले आहे. किराडपुरात 2 गटात तुफान राडा झाला आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त (सीपी) निखिल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाणामारीत दगडफेकही झाली आहे. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करण्यात आला. आता परिस्थिती शांत आहे. समाजकंटकांनी दगडफेक करत पोलिसांसह खासगी वाहनांची जाळपोळ केली आहे. तणावाची स्थिती पाहता शहरात एसआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी सांगितले. राडा करणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रात्री दोन गटात झाले वाद:किराडपुरा येथे राम मंदिरात रामनवमीची तयारी सुरू होती, त्याचवेळी बाहेर दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शिवीगाळ, धक्काबुक्की त्यातून दगडफेक सुरू झाली. मर्यादित पोलीस असल्याने अतिरिक्त कुमक मागविली. मात्र तोपर्यंत जमावाने मंदिराच्या बाहेर असलेली पोलिसांच्या वाहनांसह इतर अशी एकूण दहा ते बारा वाहन पेटविली. यात अद्याप जीवितहानी झाल्याचे समोर आले नसले, तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटना कळतात सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांनी घटनास्थळ धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली. मात्र हा वाद पहाटे चार वाजेपर्यंत सुरू राहिला. पोलिसांसह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शांततेचे आणि जिल्ह्यात सर्वत्र रामनवमी शांततेत साजरा करावे, असे आवाहन नागरिकांना केले आहे.