औरंगाबाद- जिल्ह्यात दोन दिवसांनी बाजारपेठा काही काळासाठी उघडल्या. त्यामुळे अनेकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगची ऐसीतैशी झाल्याचे पाहायला मिळाले. रविवारी अनेक ठिकाणी रेड झोन वगळता काही प्रमाणात बाजार उघडण्यास परवानगी दिल्याच्या बातम्या समोर आल्याने आजपासून व्यवहार सुरू होतील या आशेने लोक बाजारात आले होते. औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन कायम असणार असल्याचे सांगितल्याने कोणतेच व्यवहार सुरू झाले नाहीत. रस्त्यावर गर्दी मोठया प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले.
राज्यातील ग्रीन, ऑरेंज, रेड झोन मध्ये नियम अटी लावून दारू दुकान उघडण्यास सूट दिल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी तळीरामांनी दारू दुकानासमोर गर्दी केली होती. मात्र, पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी दारू दुकान उघडणार नाहीत अशी भूमिका रात्री उशिरा जाहीर केल्याने सकाळी दारू दुकान घडली नसल्याने तळीरामांचा बिसमोड झाला. त्यांना रिकाम्या हाताने परतावं लागलं.