औरंगाबाद- शहरातील कचरा संकलन करण्याचे कंत्राट पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने शहरातील कचरा टाकण्यात येणाऱ्या ठराविक ठिकाणांपैकी एखाद्या पॉईंटचा कचरा 24 तासात न उचलल्यास 1 हजार रुपये प्रति पॉईंट असा दंड घनकचरा विभागाच्यावतीने आता कंपनीला लावण्यात येणार.
सुमारे दीड वर्षापूर्वी शहरातील नारेगाव परिसरात कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा कोंडीची समस्या निर्माण झाली होती. यातून मार्ग काढण्याकरिता शासनाने मनपाला आर्थिक मदतही केली. शासनाच्या या निधीतून मनपाने शहरातील चिखलठाणा, पडेगाव, कांचनवाडी आणि हर्सूल अशा चार ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचे निश्चित केले. यासह शहरातील कचरा संकलन करण्याचे तसेच हा कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत नेण्याचे कंत्राट बंगळुरु येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले. संबंधित कंपनीने फेब्रुवारी महिन्यात काम सुरू केले आहे.