छत्रपती संभाजीनगरAmbadas Danve : राज्यात अवकाळी पावसानं शेतकर्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मराठवाड्यात 60 हजार हेक्टर पीकांची नासाडी झाली आहे. त्यांना मदत देण्याऐवजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना या गंभीर परिस्थितीचं कसलंही सोयरसुतक नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतर राज्यात निवडणूक प्रचारासाठी गेले आहेत. त्यांना शेतकर्यांच्या या नुकसानीचं गांभीर्य नाही. राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी मतद द्यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
विरोधी पक्षानं केली पाहणी :अंबादास दानवे यांनी आज बुलडाणा, जालना, संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांची भेट घेऊन शेतकर्यांच्या नुकसानीबाबत चर्चा केली. यावेळी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शिष्टमंडळानं विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं. यामध्ये मराठवाड्यातील सर्व विभागातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी त्यांनी केलीय. ज्या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे, त्या मंडळात सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, शेडनेटचं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्याचा समावेश नुकसान भरपाईत करण्यात यावा असं दाववे यावेळी म्हणाले. तसंच नुकसानीच्या अर्ज ऑफलाईन, ऑनलाईन घेण्याची मुदत वाढविण्याबाबत संबंधित विमा कंपन्यांना निर्देश द्यावेत, अशा मगण्या विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केल्या.