औरंगाबाद- चोरी केलेली मोटरसायकल विकण्यासाठी आलेल्या एका चोराला सिडको पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली. शेख अनिस शेख युसूफ (वय -29 वर्षे, रा. बायजीपुरा गल्ली क्र.31, औरंगाबाद), असे या मोटरसायकल चोराचे नाव असून त्याच्याकडून 12 मोटर सायकली जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
डीबी पथकासोबत सिडको हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी बळीराम पाटील चौकात येणार आहे. ही माहिती तत्काळ त्यांनी पोलीस उपनिरीक्षक रमेश राठोड यांना कळवली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रमेश राठोड यांनी डी.बी. पथकासोबत बळीराम पाटील शाळेजवळ जाऊन सापळा लावला. थोड्याच वेळात खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या वर्णनाचा व्यक्ती मोटार सायकलवरून येताना दिसला. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला मोटारसायकलसह पकडले.
सिडको पोलिसांच्या कारवाईत दुचाकी चोर जेरबंद; 12 मोटरसायकली जप्त - औरंगाबाद गुन्हे बातमी
औरंगाबादेतील सिडको पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने एका दुचाकी चोरास अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 12 मोटार सायकली जप्त केल्या आहेत.
त्याला कागदपत्रांची विचारणा करण्यात आली असता त्याने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तोंड उघडले. त्याच्याकडील मोटारसायकल ही त्याने हर्सूल परिसरातील पिसादेवी रोडवरुन चोरी केली होती. त्यानंतर त्याला इतर चोऱ्यांबाबत विचारणा केली त्याने, शहरातून वेगवेगळ्या ठिकाणांवरून चोरी करुन नक्षत्रवाडी भागातील एका पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेल्या 3 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 12 मोटारसायकलींची माहिती दिली. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत.
ही कारवाई सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश राठोड, पोलीस हवालदार नरसिंग पवार, पोलीस नाईक संतोष मुदिराज , पोलीस शिपाई इरफान खान यांनी केली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.