औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांना अन्नधान्याचा पुरवठा नसल्याचे समोर येत आहे. औरंगाबादच्या मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाजवळ अनेक महिला धान्याच्या प्रतीक्षेत तासनतास बसून राहिल्या होत्या. मात्र, धान्य न मिळाल्याने रिकाम्या हाताने परत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
अन्नधान्य मिळेल या आशेने गरीब महिला रस्त्यावर मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाच्या मागच्या बाजूला हातावर पोट असणाऱ्या अनेकांच्या झोपड्या आहेत. हाताला मिळेल ते काम करून पोट भरणाऱ्या हातांना कोरोनामुळे काम मिळेना झाले. सरकारने बंदच्या काळात धान्य मिळेल, असे आश्वासन दिले. मात्र, तसे होत नसल्याने लोकांना अन्नासाठी मुलांबळांसह रस्त्यावर भटकंती करण्याची वेळ आली आहे.
औरंगाबादच्या मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरात रोज 100 पेक्षा अधिक महिला धान्य मिळेल या आशेने येऊन थांबत आहेत. काही सामाजिक संघटनांनी काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी काहिंना मोफत धान्य वाटलं होतं. त्यामुळे गरजू लोकांची गर्दी तेथे रोज होत आहे. गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्स तर पाळला जात नाही. शिवाय लोक लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक होत आहे. मात्र, काही सामाजिक संघटना अन्नधान्य वाटपासाठी येतील आणि आपल्याला धान्य किंवा जेवण मिळेल या आशेवर ही लोक कोरोनाची भीती असली तरी रस्त्यावर येऊन कोणी मदतीला येईल का? कोणी आपल्या आधार देईल का? याची आतुरतेने वाट पाहत बसतात. कुणी आलं नाही तर तशीच रिकाम्या हाताने परत जातात. उभ्या राहिलेल्या परिस्थितीत गरिबांना अन्न देण्याची जबाबदारी सरकारवर असते. मात्र, मायबाप सरकारचे प्रतिनिधी आहेत कुठे, असा प्रश्न अशावेळी निर्माण होतो.
औरंगाबाद सारखे चित्र राज्यात अनेक ठिकाणी आहे. अनेक सामाजिक संघटना अन्नधान्याच्या किट वाटल्याचा दावा करतात. मात्र, प्रत्यक्षात हे चित्र पाहून होणारी मदत नेमकी होत आहे, की मोफत अन्नधान्य मिळेल म्हणून गरीब लोक गर्दी करत आहेत हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या सर्वांवर सरकारचे नियंत्रण आणि लक्ष असल्याला हवे, हे मात्र तितकेच खरे.