औरंगाबाद - लातूरला आलेल्या भूकंपावेळी मी मुख्यमंत्री होतो. आपत्ती निवारणासाठी मी लातुरात गेलो होता. मात्र, सध्याचे मुख्यमंत्री कोरोना काळात कुठेही जात नाहीत, असा आरोप होत आहे. मात्र, लातूरच्या भूकंपात आलेलं संकट एका जिल्ह्यापुरते होते. त्यामुळे तिथे मुख्यमंत्री कार्यालय हलवणे शक्य होते. मात्र, आज राज्यात सर्वत्र संकट आहे. त्यामुळे एका ठिकाणी बसून यंत्रणेला कामाला लावणे गरजेचे आहे आणि ते काम मुख्यमंत्री चांगल्या पद्धतीने करत असल्याचे राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. औरंगाबाद येथे त्यांनी आज आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी सगळीकडे जाण्याची गरज नाही - शरद पवार
रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्याची गरज असून ती वाढवण्यात यावी, अशी सूचना मी आरोग्यमंत्र्यांना दिली आहे. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयासाठी काही वेळ द्यावा व सरकारच्या मदतीसाठी पुढे यावे, आपातकालीन कायद्यानुसार जिल्हाधिकारी किंवा राज्य व केंद्र सरकार डॉक्टरांना सेवेसाठी बंधनकारक करू शकतात.
कोरोनाच्या बाबतीत देशात महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक यांची काळजी करण्याची गरज आहे, तर राज्याचा मुबंई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांची काळजी करण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.
रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्याची गरज असून ती वाढवण्यात यावी, अशी सूचना मी आरोग्यमंत्र्यांना दिली आहे. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयासाठी काही वेळ द्यावा व सरकारच्या मदतीसाठी पुढे यावे, आपातकालीन कायद्यानुसार जिल्हाधिकारी किंवा राज्य व केंद्र सरकार डॉक्टरांना सेवेसाठी बंधनकारक करू शकतात. आपण सर्व मिळून कोरोना संकटाचा सामना करुन कोरोनाला हरवू शकतो, अशी आशा शरद पवार यांनी व्यक्त केली.
औरंगाबाद जिल्हा कोरोना आढावा बैठकीत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री सुभाष देसाई, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार तसेच सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली.