छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एका युवकानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना फोन केला. तेव्हा त्याला राणे यांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. हा युवक छत्रपती संभाजीनगर शहरातील असून, त्याचं नाव रविंद्र मोटे असे आहे. आपण फक्त केंद्र सरकारकडं आमची व्यथा मांडवी म्हणून संपर्क केला होता. मात्र, त्यांनी काहीच ऐकून घेतलं नाही. त्यांनी वयक्तिक नाही, तर पूर्ण समाजाला शिवीगाळ केली, हे सहन न होणार आहे, असं मत रवींद्र मोटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केलं.
राणे यांनी केली शिवीगाळ : फुलंब्री तालुक्यातील शेतकरी असलेला रवींद्र मोटे यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना फोन केला होता. आधी हा फोन राणे यांच्या 'पीए'नं उचलला. त्यानंतर नारायण राणे बोलत असताना रवींद्र मोटे यांनी 'जय शिवराय' असं म्हणलं, त्यावर राणे यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यावर रवींद्र यांनी 'साहेब जय शिवराय म्हणायला तुम्हाला लाज वाटते का?' असा सवाल केला. त्यावर नारायण राणे संतप्त झाले. नीट बोल, या फोन नंबरमुळं पुन्हा भेटशील असं म्हणत, त्यांनी 'कसले मराठी' असं वक्तव्य करत शिवीगाळ केली. त्यावर परत फोन केला असता, त्यांनी तो उचलला नाही. मात्र, या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.