औरंगाबाद - शहरातील बालाजी नगर भागात साठवून ठेवलेल्या गुटखा गोडाऊनवर एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी छापा टाकला. गेल्या काही महिन्यांपासून आमदार जलील यांनी शहरातील अवैध गुटका व्यापार बंद करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी अवैध गुटका विक्री बंद होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासन फोल ठरल्याने इम्तियाज यांनी स्वतः कार्यकर्त्यांसह छापा मारला.
आमदार इम्तियाज जलील यांचा कार्यकर्त्यांसह गुटखा गोडाऊनवर छापा - aurangabad
बालाजी नगर भागात साठवून ठेवलेल्या गुटखा गोडाऊनवर एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी छापा टाकला.
राज्यात गुटका बंदी झाली असली तरी, अनेक ठिकाणी अवैध गुटका विक्री उघडपणे केली जात आहे. औरंगाबादमधील बालाजी नगर येथे भर वस्तीत साठवून ठेवलेल्या गुटख्याच्या अड्ड्यावर एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी छापा टाकला. छापा मारल्यावर पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी माल जप्त केला आहे.
पोलीस हप्तेखोरीसाठी शहरात अवैध धंदे करू देत असल्याचा आरोप आमदार जलील यांनी यावेळी केला आहे. हप्ता न घेता शहरातील गुटखा विक्री थांबवा अथवा येणाऱ्या काळात भीक मागून पोलिसांना हप्ता पुरवू, इतकेच नाही तर अधिवेशनात या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचेही जलील म्हणाले.