औरंगाबाद - मोदींच्या चुकीच्या निर्णयामुळे देशात कोरोनाचे संकट आले. जागतिक आरोग्य संघटनेने डिसेंबरमध्ये अलर्ट दिले होते. त्यावेळी एक जानेवारीपासून देशाबाहेरील वाहतूक बंद केली असती तर कोरोना वाढला नसता, मात्र डोनाल्ड ट्रम्पचे स्वागत करण्याच्या नादात देशात कोरोना पसरला. अनेक लोक बेरोजगार झाले. मोफत लस देण्याचे आश्वासन देऊन जनतेला फसवण्याचे काम पंतप्रधान मोदी करत आहेत. कोरोना लस देण्याचे काम केंद्र सरकारचे आहे आणि ते लस देणार नसतील, तर राज्यात आम्ही मोफत लस देऊ, असे आश्वासन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
आम्ही गोळ्या देत नाही -
एकनाथ खडसे पक्षात येताना त्यांना काही आश्वासन देण्यात आले नाहीत. आमच्या पक्षात गोळ्या देण्याची पद्धत नाही. मोदींना विचारा ते कोणत्या प्रकारचा चहा कोणत्या कपात देतात, असा टोला मलिक यांनी लगावला. नवाब मलिक यांनी औरंगाबादेत वक्फबोर्डच्या कार्यालयात बैठक घेतली. वक्फ बोर्डाचे कामकाज समाधानकारक नाही. वर्षभरात दुसऱ्यांदा बैठक घेतली. त्यामध्ये ही सत्य परिस्थिती समोर आली. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यालय मुंबईत होईल. मराठवाड्याचे विभागीय कार्यालय औरंगाबादेत असेल, तर प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय सुरू होईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.