महाराष्ट्र

maharashtra

औरंगाबादेत अडीच महिन्यांनी उघडली बाजारपेठ, मात्र पाहिल्या दिवशी मर्यादित गर्दी

By

Published : Jun 5, 2020, 7:09 PM IST

औरंगाबाद जिल्ह्यात अडीच महिन्यानंतर सम-विषम पद्धतीने बाजारपेठ उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. याकरता, ४ जून रोजी पोलीस विभागातर्फे प्रत्येक ठिकाणी स्पीकरद्वारे नियम सांगण्यात आले. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे आज बाजार उघडला असला तरी आवश्यक असलेल्या कामासाठीच नागरिक बाहेर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अडीच महिन्याने उघडली बाजार पेठ
अडीच महिन्याने उघडली बाजार पेठ

औरंगाबाद - जिल्ह्यात अडीच महिन्यांपासून बंद असलेली बाजारपेठ आजपासून सुरू करण्यात आली आहे. नियम आणि अटींसह बाजार उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. सम आणि विषम तारखेला दुकान उघडण्यास परवानगी असल्याने एका बाजूची दुकान आज उघडण्यात आली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत बाजारपेठ उघडली असली तरी पहिल्या दिवशी बाजारात मर्यादित गर्दी असल्याचे पाहायला मिळाले.

औरंगाबाद जिल्ह्यात सम-विषम पद्धतीने बाजारपेठ उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. कापड दुकानांना चेंजिंग रूम वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर, घेतलेले कपडे बदलून देण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. होम डिलिव्हरी शक्य असणाऱ्या व्यावसायिकांना सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहेत. दुकानदारांनी दुकानात सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मलगन आवश्यक केली आहे.

याकरता, ४ जून रोजी पोलीस विभागातर्फे प्रत्येक ठिकाणी स्पीकरद्वारे नियम सांगण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वछ करण्यास सुरुवात केली होती. मेडिकल सेवा सुरळीत सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून दुकान सुरू करण्यास व्यावसायिकांनी संमती दर्शवली असली तरी सम-विषम तारखेला बाजार उघडण्यास मात्र व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. याबाबत व्यापारी महासंघाने मनपा आयुक्तांना पत्रव्यवहार केला असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. शहरातील बाजार पेठेची रचना पाहता सम विषमची आवश्यकता नसल्याने सर्व बाजार रोज उघडण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या भीतीमुळे आज बाजार उघडला असला तरी आवश्यक असलेल्या कामासाठीच नागरिक बाहेर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details