छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केलीय. मात्र, यावेळी वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांनी आंदोलनात उडी घेत, त्यांच्या सोबतीने साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसात अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी गावकऱ्यांनी घातली आहे. त्याबाबत मोठ-मोठे बॅनर देखील लावण्यात आले आहेत. तर, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोबाईल टॉवरवर बसून आंदोलन करत आहेत. त्यामुळं सरकारवर सर्व बाजूनं दबाव टाकण्याचा प्रयत्न, या निमित्ताने केला जात असल्याचं राज्यात पाहायला मिळत आहे.
पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात :शहरातील क्रांती चौक भागात पुन्हा एकदा मराठा आंदोलकांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. या चौकात मागच्या अनेक वर्षांमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मोठमोठी आंदोलनं झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात पुन्हा एकदा नव्यानं याच ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. मनोज जरांगे यांनी इशारा देऊन देखील सरकारनं आरक्षणाबाबत कुठलंही पाऊल उचललं नाही. 40 दिवसाची मुदत संपल्यावर देखील सरकारचे डोळे उघडायला तयार नसल्यानं अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी क्रांती चौकात आंदोलक उपोषणाला बसल्याची माहिती देण्यात आलीय. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या गावांमध्ये साखळी उपोषण करण्यात येईल. आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विजय काकडे पाटील यांनी जाहीर केली.
मोबाईल टॉवरवर उपोषण :राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी उपोषणाला सुरुवात केलीय. त्यात शेकटा तालुक्यात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांनी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा पाठवलाय. जर आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर आम्हाला पद नको, अशी भूमिका त्यांनी घेतली. इतकंच नाही, तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी त्यांनी मोबाईल टॉवरवर चढून उपोषणाला सुरुवात केलीय. आता आरपारची लढाई होईल, ही लढाई सरकारला परवडणार नाही असा इशारा यावेळी सुधाकर शिंदे यांनी दिला. जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत मोबाईल टॉवरवरून खाली उतरणार नाही, असा इशारा देखील सुधाकर शिंदे यांनी दिला.
अनेक गावांमधे नेत्यांना प्रवेश बंदी :मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या दोन महिन्यांपासून पेटला आहे. राज्यात वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं एक महिन्याची मुदत मागण्यात आली होती. मराठा समाजानं दहा दिवसाचा अधिकचा वेळ देऊनही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला नाही. मुदत पूर्ण होऊनही अद्याप कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळं राज्यभर वेगवेगळ्या पद्धतीनं मराठा समाजानं आंदोलनांना सुरुवात केलीय. त्यात गेल्या चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक गावांनी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी घातली आहे. ज्या नेत्यांना आमच्या समाजाशी काही देणंघेणं नाही, त्यांनी आमच्याकडं येऊ नये, अन्यथा अवमान होईल, अशी ताकीद दिली आहे. त्यामुळं राजकीय नेत्यांची कोंडी करण्याचं काम मराठा आंदोलकांनी केलं आहे.
हेही वाचा -
- Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन; आम्ही 'मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी'
- Rohit Pawar : मराठा आरक्षण संदर्भात रोहित पवारांचं सरकारला आवाहन; म्हणाले...
- Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; सरकारला शेवटचा इशारा