औरंगाबाद - मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत भाजपा षडयंत्र करत असल्याने आंदोलकांमध्ये फूट पडल्याचा आरोप मुख्य समन्वयक रवींद्र काळे पाटील यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोणालाही विचारात न घेता भूमिका जाहीर केल्या जात आहेत. शिवाय त्या भूमिकांना कोणत्याही समन्वयकांचे समर्थन नसते, तरी सुद्धा सर्वांच्या वतीने भूमिका जाहीर केली जाते, असा आरोप रवींद्र काळे पाटील यांनी केला. रवींद्र काळे पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरावर मशाल मोर्चा काढण्याची घोषणा केली. मात्र काही वेळातच दुसरे समनव्यक रवींद्र काळे पाटील यांनी पत्रक काढून या भूमिकेला आमचे समर्थन नसल्याचे सांगितले. मोर्चाची घोषणा करत असताना कोणालाही विचारात घेतले नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे लाखांचे मोर्चे शिस्तीत काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात फूट पडल्याचे दिसत आहे.
मुख्य समन्वयक अंधारात...
काही दिवसांपूर्वी औरंगाबादेत मराठा क्रांतीठोक मोर्चाची राज्यव्यापी बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या घरावर मशाल मोर्चाबाबत कुठलीच भूमिका घेण्यात आली नसताना अचानक रमेश केरे पाटील यांनी एकट्यांनी भूमिका जाहीर केली. इतर समन्वयकांना विचारात का घेतले जात नाही?, त्यांनाही आंदोलनाची माहिती का दिली जात नाही? असा प्रश्न रवींद्र काळे यांनी उपस्थित केला.