छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : मी वापरलेल्या शब्दांचा विपर्यास केला जातोय. मात्र माझा म्हणायचा उद्देश हा वेगळा होता. त्याला जातीवादाचा रंग दिला जातोय. दोन समाजात जर माझ्यामुळं तेढ निर्माण होत असतील तर मी वापरलेला 'तो' शब्द मागे घेतो असं मत मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केल.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमच्या युवकांच्या व्यथा मी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मुद्दाम जातीवादाकडं वळवण्यात आलं. मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोनिया गांधींचं उदाहरण देत एक सल्ला दिला. या सल्ल्यावर आता मनोज जरांगेंनी मी लायकी शब्द मागे घेत असल्याचं सांगितलं. सगळ्यांनीच मराठ्यांना आरक्षण दिले नाही. सगळे नेते दोषी आहेत. सगळ्याच पक्षांचे नेते आम्हाला घेराव घालण्यात येत आहे. अटक करणार नाही म्हणाले, मात्र अटक केली. भुजबळ जातीय तेढ निर्माण करतात. तीच सरकारची भूमिका आहे का?
काय होतं विधान :मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सभेत चांगलं शिक्षण घेऊनही लायकी नसणाऱ्या लोकांच्या हाताखाली मराठा युवकांना काम करावं लागतं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. जरांगे पाटील म्हणाले की, मी जे बोललो ते बरोबर आहे. मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय. आमचे मुलं उच्च शिक्षण घेतात हुशार असतात. मात्र असे असूनही बेरोजगारीमुळं इतरांचे झेंडे पकडतात. त्या लोकांचं शिक्षण काय? काही लोक तर जास्त शिकलेलीही नसतात. तरीदेखील त्यांचे झेंडे उचलावे लागतात, असा त्याचा अर्थ होता. मात्र त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावून त्याला जातीकडं ओढण्याचं काम केलं जातंय.