मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद छत्रपती संभाजीनगर : आरक्षणासाठी मराठा समाज मुंबईला पायी प्रवास करून जाणार आहे. त्यांचा मार्ग ठरवण्याचं काम सुरू आहे. नियोजन करूनच पुढचं पाऊल उचलणार असल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलीय. शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलं आहे. यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्यानंतर मुस्लीम आरक्षण, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
आम्हाला मुंबईत येण्याची हौस नाही :सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्यानं घेतला पाहिजे असं, प्रामाणिकपणे सांगतो, आम्हाला पायी चालत मुंबईला येण्याची हौस नाही. ज्या गावातून मराठा समाज येणार आहे, त्याच गावातील मराठा समाज त्याबाबत नियोजन करणार आहे. जेवण, इतर व्यवस्थेबाबत ताण येणार नाही, असं नियोजन करत असून तयारी आता पूर्ण होत आली आहे. आता आम्ही मुंबईला जाण्यासाठी सज्ज आहोत. मुंबईला जाण्याचा रूट उद्यापर्यंत ठरेल. मोठ्या ताकदीनं मराठा समाज या शेवटच्या आंदोलनात, लढ्यात मुंबईकडं कूच करणार आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही, असं माझ्यासकट सर्व समाजानं ठरवलं आहे, असं मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं.
भुजबळांवर पुन्हा टीका :आमची संस्कृती कशाला काढता, आम्ही आमचं धोरण बघणार. अम्ही बंजारा, ओबीसी मुस्लिमांसाठी लढणार आहोत. मात्र, हे उगाच गप्पा ठोकतात. गोरगरिबांचा वापर करून आमच्यात भांडणं लावता आहेत. मात्र आमचं प्रेम कमी होणार नाही. तर छगन भुजबळ आंदोलन घडवून आणतात, असा आरोप त्यांनी केलाय. पत्रकारांचं काम प्रामाणिक आहे, मात्र ते त्यांच्या मागे कशाला लागले. जनता मागे आहे, म्हणून काहीही निर्णय घेऊन समाजाला फसवणार नाही. आता मुंबईला गेलो, असतो तर जाऊन दोन दिवसात माघारी यावं लागलं असतं. मुंबईमधील प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी आमचं स्वागत केलं पाहिजे. ओबीसी आरक्षणातून आम्ही आरक्षण मिळवणार आहोत. न्यायालयानं मराठा जात मागास जात सिद्ध करा असं, म्हटलं असेल तर मागासवर्ग आयोगानं ते सिद्ध करावं, असं जरांगे यांनी म्हटंलय.
मागास आयोगावर टीका :आरक्षणासाठी आम्हाला जो निकष लावला आहे, तोच निकष इतर आरक्षणांनाही लागू करावा. तसंच आमचा ओबीसीमध्ये समावेश करावा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलीय. आरक्षण यादीतील 83 वा क्रमांक ओबीसींना लागू केला, तरी संपूर्ण महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण लागू होईल, पण राजकीय इच्छाशक्ती नाही. आता मराठे सभांना जात नाहीत, धार्मिक सप्ताहाला जात नाहीत, कुठेही जात नाहीत. आरक्षणासाठी जवळपास 200 जणांनी बलिदान दिलं. त्या वेदना कमी होणार नाहीत, असं जरांगे पाटील म्हणाले. आरक्षणाच्या वेदना आमच्या हृदयात कायम राहतील. त्यामुळं अशाच वेदना कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या समजून घ्याव्यात, अशी जाहीर विनंती त्यांनी केलीय. आरक्षण लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटत नाहीत? ते पाहतो, मुस्लीम, धनगर आरक्षणाबाबतही पाहतो. मी आरक्षण मागतो म्हणून मी जातिवाद करत नाही, असं देखील जरांगे यांनी म्हटंलय.
हेही वाचा -
- मनोज जरांगेंच्या सभेनंतर कराडमधील १४ जणांवर दोन दिवसांनी गुन्हा; नोटीस दिली एका महिन्यानंतर, समाज आक्रमक
- क्युरेटिव्ह पिटीशन मराठा समाजासाठी एक आशेचा किरण, शिंदे गटाची प्रतिक्रिया
- कोणाला आरक्षण दिलं पाहिजे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं