छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange Patil: २० जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता अंतरवाली येथून मुंबईला पायी जाणार असल्याची माहिती, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी दिली. आपण आहोत तोपर्यंत आपल्याला मुलांना आरक्षण मिळवून द्यायच आहे, ही आरक्षणाची शेवटची लढाई आहे. कुणीही घरी थांबवू नका. पायी यात्रेत सहभागी व्हा, समाजाचा मुलगा म्हणून प्रयत्न करतोय सर्वांनी साथ द्या. सगळ्यांनी आचारसंहिता पाळूनच पायी यात्रेत सहभागी व्हा. आपलं रक्षण आपणच करायचं आहे. मराठा समाज मुंग्यांसारखा पायी यात्रेत सहभागी झाला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय. उपचार घेऊन जरांगे पाटील गुरुवारी सायंकाळी गावी गेले.
जरांगे पाटील ठणठणीत, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज: मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना अशक्तपणा, किडणीवर सूज, खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवत होता. आजारावर 5 दिवस उपचार घेतल्यानंतर जरांगे पाटील यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच जरांगे पाटील अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. जरांगे सध्या मुबंई मोर्चाच्या नियोजनाच्या कामाला लागलेत.
असा असणार मार्ग : ओबीसी मधूनच आरक्षण द्या या मागणीसाठी २० जानेवारी रोजी मराठा समाज मुंबईला पायी जाणार आहे. अंतरवालीहुन सकाळी नऊ वाजता प्रवास सुरू होईल. शहागड, गेवराई, खरवंडी, पाथर्डी, अहमदनगर, सुपा शिरूर, रांजणगाव, वाघोली, लोणावळा पनवेल वाशी चेंबूरमार्गे आझाद मैदान शिवाजी पार्कवर जाणार आहे. काही सदस्य मुंबईला जाऊन पाहणी करून येणार आहेत. सगळ्या वस्तू सोबत घेऊनच चला. कशाचीही कमतरता पडणार नाही याची काळजी घ्या, पायी यात्रा ज्या गावातून जाईल त्या गावातील लोकांनी सहकार्य करावे. पाण्याची व्यवस्था करावी. जे पायी मुंबईला येतील त्यांनी गाडीला घर बनवावं. मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाने स्वयंसेवक व्हावे. महिलांची वेगळी तुकडी असेल, कुणीही व्यसन करायचं नाही. सर्व आंदोलकांना मोर्चाचं नियोजन पाठवणार, औषध गोळ्याही सोबत असू द्या. आंदोलकांनी गाडीतच झोपावे. गावकऱ्यांनी वर्गणी करून गाड्यांचा खर्च करावा. पायी मोर्चाच्या नावाखाली कुणीही पैसे देऊ नका आणि दिले असतील तर माघारी घ्या. यात्रेला अजून नाव दिलं नाही पण नक्की देऊ आज फक्त रूट सांगितला आहे. एक महिन्यापेक्षा जास्त सामान पुरेल एवढं सामान सोबत घ्या. ७० - ८० वर्षात एकही नेता आपले मुलं मोठे करायला पुढे आला नाही. आता आपल्यालाच आपले मुलं मोठे करायचे आहेत. मराठे मुंग्यांसारखे आंदोलनात दिसले पाहिजेत. या लढ्यात सगळे सहभागी व्हा सगळे जण या मोर्चाचे साक्षीदार बना. पायी मोर्चात शांतता असली पाहिजे उद्रेक नको, आंदोलन शांततेतच झालं पाहिजे असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय.