औरंगाबाद- मागील महिन्यापासून सिल्लोड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. तसेच तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू दरही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात ठिकठिकाणी लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. तालुक्यातील उंडणगाव येथील आरोग्य केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी शासनाने घालून दिलेल्या कोविडच्या विविध नियमांचा विसर सर्वसामान्य नागरिकांना पडला असल्याचे दिसून आले.
रुग्णसंख्येचा आलेख उंचावत आहे
आज दिवसभरात सिल्लोड तालुक्यात 70 नवे रुग्ण आढळून आले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात शहरापेक्षा अधिक कोरोना रुग्णांचे निदान सुरूच असून आज शहरात 15 तर ग्रामीण भागात 55 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आजपर्यंत दुसऱ्या लाटेत 1822 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर सध्या 786 रुग्णांवर तालुक्यातील विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत, आज 45 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत एकूण 1001 रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर दुसऱ्या लाटेत 35 जणाचा मृत्यू झाला आहे.