सिल्लोड (औरंगाबाद) - भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आली आहेत. मात्र, देशात आजही काही समाज समाजप्रवाहापासून दूरच आहेत. भटक्या-विमुक्त जाती प्रवर्गात येणाऱ्या फासेपारधी समाजाकडे अनेकांचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. मात्र, आम्हीही भारत देशातीलच नागरिक आहोत. आम्हालाही देशातील इतर नागरिकांसारखी वागणूक मिळावी, शासकीय योजनांचा लाभ मिळावा, अशी आर्त इच्छा सिल्लोड तालुक्यातील जिवरग टाकळी परिसरातील पारधी समाजातील लोकांनी व्यक्त केली.
बिकट अवस्था शिक्षणाची गरज
फासेपारधी समाजाची सामाजिक, आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय आहे. यामुळे ही जमात समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. परिणामी त्यांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मिळेल ते काम करावे लागते. पण, समाजाकडे इतरांचा पाहण्याचा विशेष्ट दृष्टिकोन असल्यामुळे तेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे पारधी समाजाची अवस्थी बिकट बनत आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. मात्र, अनेकांची प्रसुती घरीच होत असल्याने काहींचे जन्म दाखलेच नाहीत. त्यामुळे शिक्षणासाठीही मोठी अडचण निर्माण होत असल्याचे जिवरग टाकळी येथील नागरिकांनी सांगितले.