औरंगाबाद -इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून कोविडविषयक बातम्यांचा अतिरेक थांबवण्याची विनंती करणारी जनहित याचिका अमित जैन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमुर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमुर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी हा निर्णय दिला.
बातम्यांच्या प्रसारणावर प्रतिबंध घालता येणार नाही -
प्रकरणात याचिकाकर्ते अमित जैन यांनी अॅड. कुलदीप कहाळेकर यांच्या मार्फत खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेनुसार, हिंदी, मराठी, इंग्रजी इलेक्ट्रॉनिक मीडिया, न्यूज चॅनलच्या माध्यमातून दिवसभरात किमान १२ तास कोरोनाविषयक बातम्या सतत दाखवतात. त्यामुळे जनतेच्या मनात भीती वाढत जाते. शिवाय यामुळे कोविडविषयी गैरसमजही निर्माण होत आहे. सतत स्मशानभूमीचे व्हिडिओ, हॉस्पिटलबाहेर रडणारे नातेवाईक दाखवले जात आहेत. प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये भीती वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषयक बातम्या थांबवा अथवा त्यांच्यवर नियंत्रण आणा, अशी मागणी याचिकेत केली होती. यासंदर्भात निर्णय देताना प्रसारमाध्यमातून सत्य आणि अचूक बातम्यांच्या प्रसारणावर प्रतिबंध घालता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
हेही वाचा - 'भाजपशासित राज्यांमध्ये कोरोना मॅनेजमेंट केवळ जाहिरातींमध्येच'