छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Gunaratna Sadavarte News : मुंबईत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा मराठा आंदोलनातील कार्यकर्ता मंगेश साबळे आणि त्याच्या मित्रांनी फोडल्याचं समोर आलंय. त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करणारा मंगेश साबळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. दोन महिन्याआधी मराठा समाजाच्या पुकारलेल्या बंद मध्ये त्यानं स्वतःची कार जाळत सरकारचा निषेध व्यक्त केला होता, तर त्याआधी परिसरातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चक्क दोन लाख रुपये तहसील कार्यालयात उधळत सरकारी अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला होता. आपल्या आंदोलन करण्याच्या पद्धतीमुळं तो परिसरात चांगला चर्चेत राहिला होता, तर आजच्या कृतीमुळं राज्यभर त्याच्या आंदोलनाची दखल घेतली जात असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाळली होती स्वतःची कार : मंगेश साबळे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावाचा सरपंच आहे. सुरुवातीला बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा तो सक्रिय कार्यकर्ता होता. मात्र नंतर त्यानं राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामाला सुरुवात केली. मात्र तिथं देखील तो जास्त रमला नाही आणि गेल्या वर्षभरापासून तो फक्त सरपंच म्हणून गावाचं कामकाज पाहात आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात तो सक्रिय आंदोलक म्हणून काम करतोय. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणा दरम्यान अंतरवाली सराटी इथं पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. त्यानंतर राज्यात बंदची हाक देण्यात आली होती. या दरम्यान फुलंब्री तालुक्यात सरकारचा निषेध व्यक्त करत असताना मंगेश साबळे यानं स्वतःची नवीकोरी कार जालळी होती. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांवर आलेला त्याचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत राहिला होता.