औरंगाबाद - ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील ५८२ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. जिल्ह्यात २ हजार २६१ केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील ११ हजार ४९९ उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा फैसला मतदान यंत्रात बंद होणार आहे.
औरंगाबादेत ग्रामपंचायत मतदानाला सुरुवात ९ तालुक्यातील निवडणुका - जिल्ह्यातून ६१७ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होत आहेत. यापैकी ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापुर्वीच बिनविरोध झाल्या असून आता ५८२ ग्रामपंचायतींमधून सदस्य निवडण्यासाठी मतदान होणार आहे. नऊ तालुक्यांमधील ३५ ग्रामपंचायतींच्या १८३ प्रभागात ६१० सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्वात अधिक वैजापूर तालुक्यात ९ तर, त्याखालोखाल सिल्लोड तालुक्यात ६ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली.
जिल्ह्यात ६१० उमेदवार बिनविरोध -
औरंगाबाद ८९,सिल्लोड ७७, वैजापूर २१६, कन्नड २१, पैठण २२, फुलंब्री ५७, सोयगाव ९२ तर खुलताबाद तालुक्यातील ३६ असे एकूण ६१० उमेदवार बिनविरोध आले आहेत. या निवडणुकीमध्ये १२ लाख ४६ हजार ५३६ मतदार मतदान करून आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहेत.
कोरोनाच्य दृष्टीने घेतली विशेष काळजी -
दरम्यान, मतदान सुरू होण्याआधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाईज करण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाणार आहे. कोरोनाबाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती, तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदान वेळ संपण्याच्या अर्धा तास अगोदर प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येणार आहे.