औरंगाबाद- जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. रुग्णालयात कोरोना संशयितांची नमुने घेण्याचे काम हा डॉक्टर करत होता. जवळपास पाच दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरला सर्दी, तापाची लागण झाली. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची भीती होती. त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
शासकीय रुग्णालयातील डॉक्टरचा अहवाल निगेटिव्ह, औरंगाबादकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास - औरंगाबाद
संशयित रुग्णांचे नमुने घेणाऱ्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरला सर्दी आणि ताप आल्याने त्यांना देखील कोरोना झाल्याचा संशय निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांचीही तपासणी करण्यात आली. या तपासणीत अहवाल निगेटिव्ह आला असून संबंधित डॉक्टरला होम क्वारन्टाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तीन दिवसांनी प्राप्त झालेल्या अहवालात डॉक्टरांना कोरोनाची लागण झालेली नसल्याचं निष्पन्न झाल्याने रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या संशयित रुग्णांची वाढ होत आहे. आतापर्यंत एकच पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला होता. मात्र, तो रुग्णही आता निगेटिव्ह असल्याने जिल्ह्यात बाधित रुग्ण एकही नाही.
संसर्ग झाल्याच्या शक्यतेने अनेक लोक आपली तपासणी करून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात धाव घेत आहेत. कोरोना संशयितांचे नमुने घेण्याऱ्या डॉक्टरचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सोबत काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. नागरिकांनी घरीच राहून सर्वाना सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.