औरंगाबाद - कन्नड तालुका हा विविधांगी निसर्गाने नटलेला आहे. या तालुक्यात विविध ऐतिहासिक स्थळे आहेत. गौताळा अभयारण्य विविध जाती प्रजातींची वनस्पती फुले, औषधी वनस्पती रानवेली यासह विविध जाती प्रजातींचे पशु पक्षी आणि प्राणी यासाठी प्रसिद्ध आहे. कन्नड तालुक्यामधे गावरान आंब्याची जास्त लागवड असते. मात्र, यावर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा आंबा पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे गावरान आंब्याची 50 टक्क्यांनी घट झाली आहे.
औरंगाबादपासून 60 किमी अंतरावर हा तालुका असून, चाळीसगावपासून 30 कमी अंतरावर आहे. कन्नड तालुक्यात निसर्गरम्य गौताळा अभ्यारण्य, जगप्रसिद्ध असलेली पितळखोरा लेणी आहेत. गणपती उत्सवात गुलालाऐवजी फुलाची उधळण करणारा हा तालुका आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. सर्व ऋतूतील फळ पिके येथील शेतकरी आपल्या शेतात पिकवतो. कन्नड तालुक्यामधे गावरान आंब्याची जास्त लागवड असते. यासाठी वासडी, मेहगाव, निभोरा, ब्राम्हणी गराड़ा, चिकलठान आदी गावे गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहेत. जसा जसा आंब्याचा गोडवा संपत आहे, तसा गावरान आंब्याचा लोणच्याची चाहूल कन्नडच्या नागरिकांना लागली आहे.