औरंगाबाद -सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव शिवारातील एका विहिरीत माय-लेकीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. प्रारंभी मृतदेह सापडल्यानंतर पोलीस घटनास्थळी उशिरा का आले, असा सवाल नातेवाईकांनी केला होता. त्यांनतर या घटनेला वेगळे वळण लागले होते. घटनेतील पीडितांवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप करीत शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती.
आज (मंगळवार) पीडितांचे शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह डोंगरगाव येथे आणण्यात आला. घटनेतील आरोपी शोधून तत्काळ अटक करा, या मागणीसाठी नातेवाईकांनी जवळपास दीड तास अंत्यसंस्कार रोखून ठेवला होता. या ठिकाणी उपस्थित काही मंडळींनी पोलीस आणि नातेवाईकांमध्ये मध्यस्थी साधल्यानंतर शोकाकुल वातावरण व पोलीस बंदोबस्तात या माय-लेकीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.