औरंगाबाद- दुचाकी घेण्यासाठी हात-उसने दिलेले 3 हजार रुपये मागणाऱ्या मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना वाळूज भागात घडली आहे. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश नामदेव दिवेकर (वय 32 रा. पंढरपूर. ता. जि. औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दोस्त दोस्त ना रहा ! औरंगाबादमध्ये उधारी मागितली म्हणून मित्राला जिवंत जाळले - जिवंत
दुचाकी घेण्यासाठी हात-उसने दिलेले 3 हजार रुपये मागणाऱ्या मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना वाळूज भागात घडली आहे.
दत्ता कराळे असे आरोपीचे नाव आहे. मृत उमेश आणि दत्ता या दोघांनी मिळून साडेतीन हजार रुपयात जुन्या वापरातील एक दुचाकी खरेदी केली होती. त्यासाठी उमेशने 3 हजार रुपये दिले होते. त्यानंतर ती दुचाकी दत्ता वापरत होता. दुचाकीला दिलेले पैसे अनेक दिवसानंतरही परत मिळत नसल्याने उमेशने दत्ताच्या घरी येऊन पैशाची मागणी केली.
घरी येऊन पैशाची मागणी केल्याने दत्ताचा राग अनावर झाला. त्याने घरात ठेवलेली पेट्रोलची बाटली उमेशच्या अंगावर ओतून काडी लावली. या घटनेत उमेश गंभीर जळाला. त्याच्यावर उपचार सुरु असताना रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला.