गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) : छत्रपती संभाजीनगर, पुणे महामार्गालगत कायगाव टोके येथील सिद्धेश्वर मंदिराजवळील गोदावरी नदीत चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही दु:खद घटना शनिवारी दुपारी चारच्या दरम्यान घडली. याबाबत माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील काही तरुण पाणी आणण्यासाठी कायगाव टोका येथे आले होते. गोदावरी नदीत उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे.
पालखेड गावावर शोककळा : प्राथमिक माहितीनुसार, या चौघांमध्ये बाबासाहेब अशोक गोरे (वय 35), नागेश दिलीप गोरे (वय 20), अक्षय भागीनाथ गोरे (वय 20) आणि शंकर पारसनाथ घोडके (वय 22) यांचा समावेश आहे. दरम्यान, शंकर पारसनाथ घोडके यांचा मृतदेह सापडला असून, अन्य तिघांचे मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू आहे. हे चौघेही वैजापूर तालुक्यातील पालखेड गावचे रहिवासी आहेत.
घटनास्थळी मोठी गर्दी : कायगाव येथील गोदावरी नदीत चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांकडून मुलांचा शोध घेतला जात आहे. याबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली आहे. याबाबतची माहिती मुलांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. पाण्यात बुडालेल्या आणखी तिघांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.