औरंगाबाद -अयोध्यानगर भागात एका किराणा दुकानाला आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दल वेळेवर न पोहोचल्याने सर्व दुकान जळून खाक झाले. या घटनेत सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकान मालकाने व्यक्त केला आहे.
औरंगाबादमध्ये आयोध्यानगर भागात एका किराणा दुकानाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली
अयोध्यानगर भागात राजू मोरे (रा.वाळूंज महानगर) यांचे 'समीक्षा किराणा' दुकान आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास दुकानातून धूर घरात येत असल्याने मोरे झोपेतून जागे झाले. त्यांनी जाऊन पाहिले असता दुकानात आगीचे लोळ दिसत होते. दुकानात लागलेली आग पाहून घरातील महिलांनी आरडाओरड केला.
हेही वाचा - अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या अमेरिकन पर्यटकांचे हाल; पर्यटक संख्या घटण्याची भीती
रहिवाशांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग जास्त पसरल्याने नागरिकांनी अग्निशमन दलाच्या क्रमांकावर संपर्क करून आगीची माहिती दिली. बराचवेळ होऊनही अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झालेच नाही. त्यामुळे काही नागरिक थेट अग्निशमन कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना घेऊन आले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण दुकान आगीच्या विळख्यात आले होते. अग्निशमन दलाचे बंब वेळीच घटनास्थळी दाखल झाले असते, तर झालेले नुकसान टळले असते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सणासुदीचे दिवस असल्याने मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच दुकानात माल भरला होता. वाळूंज एमयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.