औरंगाबाद -कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात विवाह सोहळ्यांवर काही बंधन घालण्यात आली असली तरी औरंगाबाद जिल्ह्यात मात्र 4 एप्रिलपर्यंत विवाह सोहळे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मंगल कार्यालय चालकांना पुन्हा आर्थिक नुकसान सोसण्याची वेळ आली आहे.
'औरंगाबाद जिल्ह्यातच विवाहबंदी का?'
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, संसर्ग अधिक वाढू नये, याकरिता राज्यात विवाह सोहळ्यांवर काही बंधन घालण्यात आली. ज्यामध्ये सोहळ्यास पन्नास लोकांनाच परवानगी देण्यात आली. त्यात नियम आणि अटींचे पालन करून विवाह सोहळे घेता येतील, अशी परवानगी देण्यात आली आहे. राज्यात नियमांचे पालन करून सोहळे घेण्यात येत असले तरी औरंगाबाद जिल्ह्यात 11 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान जिल्ह्यात विवाह सोहळे करता येणार नाहीत, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जारी केले. नियम अटींना अधीन राहून राज्यातील इतर शहरांमध्ये विवाह सोहळे करणे शक्य असताना औरंगाबाद जिल्ह्यातच बंदी का, असा प्रश्न औरंगाबाद येथील मंगल कार्यालय चालकांनी उपस्थित केला.
ऐन सिझनला व्यवसायावर परिणाम
मार्च ते मे महिना याकाळात विवाह तिथी अधिक असतात. त्यामुळे याच काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मागील वर्षी याच काळात लॉकडाऊन असल्याने विवाह होऊ शकले नाहीत. त्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागले. मंगल कार्यालय बंद ठेवली तर त्यावर आधारित केटरिंग, मंडप, बँड यासारखे पूरक व्यवसाय अडचणीत येतात. शिवाय कार्यालयात कामाला असलेल्या लोकांचा रोजगार अडचणीत येतो, कार्यालयाला लागणार खर्च असे अनेक प्रश्न उद्भवतात. 4 एप्रिलपर्यंत येणाऱ्या तीन ते चार विवाह तिथी, मुंज तिथी आणि वाढदिवसासाठी आधीच केलेली आगाऊ बुकिंग रद्द करावी लागली. एक वर्ष नुकसान सोसले मात्र आता काही निर्बंध लावून विवाहसोहळे करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कुलस्वामिनी मंगल कार्यालयाचे प्रमुख विलास कोरडे यांनी केली.
सर्वसामान्यांचे नियोजन बिघडते
एखादा सोहळा घरी असला, की त्याची तयारी महिनाभर आधी सुरू होते. त्यात विवाह म्हटले, की तयारी मोठी असते. मंगल कार्यालय आरक्षित करणे, फोटो काढण्याऱ्याला सांगून ठेवणे, पत्रिका छापणे, घरात किराणा भरून ठेवणे, वधू-वरांसह पाहुण्यांसाठी बाहेरचे कपडे आणणे, केटरिंगसाठी नियोजन करणे, पाहुण्यांना निमंत्रण पाठवणे, अशी अनेक कामे काही दिवस आधीपासून सुरू करावी लागतात. त्यात अचानक बंदी घातल्याने नियोजन बिघडते. पुन्हा नवीन मुहूर्त येईपर्यंत थांबणे म्हणजे अनंत अडचणी येतात. त्यामुळे अचानक बंदी घालण्यापेक्षा काही नियम लावून विवाह सोहळ्यानां परवानगी द्यायला हवी, अशी मागणी विवाह सोहळे करू इच्छिणाऱ्या कुटुंबीयांची आहे. औरंगाबादच्या कुलस्वामिनी मंगल कार्यालयात परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी...