महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप-एमआयएमच्या गटाचा एकमेकांवर तलवारीने हल्ला; १२ गंभीर जखमी

'एमआयएम' पक्षाचे शहराध्यक्ष मुंशी पटेल आणि भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या राहुल चाबुकस्वार यांच्या गटांमध्ये श्रेयवादावरून तलवारी लाठ्या-काठ्यांनी तुफान हाणामारी झाली. ही घटना शनिवारी मध्यरात्री शहरातील पुंडलिकनगर भागामध्ये घडली.

औरंगाबाद

By

Published : Mar 24, 2019, 3:40 PM IST

औरंगाबाद - 'एमआयएम' पक्षाचे शहराध्यक्ष मुंशी पटेल आणि भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या राहुल चाबुकस्वार यांच्या गटांमध्ये श्रेयवादावरून तलवारी लाठ्या-काठ्यांनी तुफान हाणामारी झाली. ही घटना शनिवारी मध्यरात्री शहरातील पुंडलिकनगर भागामध्ये घडली. या हाणामारीमध्ये पटेल हे गंभीर जखमी झाले असून एकूण १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील २८ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे चाबुकस्वार हे फरार आहेत.

मुंशी पटेल आणि राहुल चाबुकस्वार या दोन्ही नेत्यांच्यात श्रेय वादामुळे शनिवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुंडलिकनगरातील घुसेल कॉलनीत दोन्ही गट समोरासमोर आले. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या भांडणाचे भीषण हाणामारीत रुपांतर झाले. दोन्ही गटातील लोकांनी हातात तलवारी-कोयते, लोखंडी रॉड लाठ्या-काठ्यांनी एकमेकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात मुंशी पटेल यांच्यासह दोन्ही गटातील १२ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भाजप गटातील ११ जणांविरोधात तर एमआयएम गटातील १७ जणांविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. भाजप पदाधिकारी राहुल चाबुकस्वार हे घटनेनंतर पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details