महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - औरंगाबादला शेतकऱ्याची आत्महत्या

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील दिगावमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अंकुश नामदेव सुसुंद्रे असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. कर्जबाजारीपणा आणि त्यातच झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्यामुळे निराश झालेल्या अंकुशने विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले.

Farmer commits suicide
अंकुश नामदेव सुसुंद्रे

By

Published : Oct 11, 2020, 12:46 PM IST

कन्नड (औरंगाबाद) -औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील दिगावमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळूनतरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अंकुश नामदेव सुसुंद्रे असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. कर्जबाजारीपणा आणि त्यातच झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्यामुळे निराश झालेल्या अंकुशने विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. अंकुशच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

अकुंशचे वडील नामदेव सुसुंद्रे यांच्या मालकीची दिगावमध्ये चार एकर जमीन आहे. अकुंश त्यांना शेतीकामामध्ये मदत करायचा, सैन्यदलात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यादृष्टीने त्याची तयारी सुरू होती. त्याने सैन्यभरतीसाठी दोनवेळेस प्रयत्न केला; मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे देखील तो गेल्या काही दिवसांपासून निराश होता. मागील महिन्यात चिंचोली लिंबाजी परिसरासह दिगाव परिसरात सलग पंधरा दिवस पावसाने थैमान घातल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे हातचे गेल्याने आता पुढील खर्च कसा भागणार, या विवंचनेत असलेल्या अंकुशने शेताच्या शेजारी असलेल्या विहिरीत उडी घेतली. ही बाब त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरड करून स्थानिकांना बोलावले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्याच्यावर दिगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details