औरंगाबाद -2 ऑक्टोबर म्हणजे परमपूज्य महात्मा गांधी यांची जयंती. ही जयंती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. औरंगाबादमध्ये एक आजोबा आहेत, जे महात्मा गांधींना देवासमान मानतात. इतकेच नाही तर त्यांच्या जयंतीच्या दिवशी उपवास करत मौन व्रत धारण करून गांधी विचारांचे वाचन करतात.
गांधी विचारांनी प्रेरित आजोबा करतात जयंतीला उपवास ज्ञानप्रकाश मोदाणी असे या आजोबांचे नाव आहे. मोदाणी आजोबा लहानपणापासूनच गांधीजींच्या विचारांपासून प्रेरित आहेत. 20 व्या शतकातील सर्वात थोर पुरुष म्हणजे गांधीजी. जगात अनेक देशांमध्ये त्यांचे पुतळे आहेत, इतकेच काय तर त्यांच्या नावाचे मार्ग देखील आहेत. जगातील शंभर विद्यापीठांमध्ये गांधीजींच्या विचारांवर आजही संशोधन केले जाते, असा विश्वमान्य पुरुष देवा समानच आहे. त्यामुळेच त्यांच्या जयंतीला आपण फलाहार घेऊन उपवास करतो, त्याच बरोबर त्यांचे विचार जगाच्या कानाकोपऱ्यात जावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत ज्ञानप्रकाश मोदाणी यांनी सांगितले.
हेही वाचा -मराठा आरक्षणासाठी आता 'ऐक्य परिषदेची' हाक
गांधीजींचे विचार नव्या पिढीला माहीत व्हावेत, यासाठी मोदाणी यांनी आपल्या स्वतःच्या जागेत एक छोटे संग्रहालय तयार करायला सुरुवात केली आहे. या संग्रहालयात बापूंच्या लहानपणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंतची अशी 55 वेगवेगळी चित्रे लावण्यात आली आहेत. या चित्रांमध्ये बापूंचा जीवनप्रवास दर्शवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बापूंची लिहिलेले आणि त्यांच्यावर आधारित पुस्तकांचे एक वाचनालय तयार करण्यात येत आहे. बापूंच्या छोट्याशा पुतळ्याजवळ एक चरखा ठेवण्यात आला आहे. या चरख्यावर बसून सूत काढत श्रमदान देखील करता येणार आहे. बापूंचे विचार नव्या पिढीला माहीत व्हावेत यासाठी हे संग्रहालय सर्वांसाठी मोफत खुले करण्यात येणार आहे.
बापूंच्या विचारांमुळे नव्या पिढीला वेगळी दिशा मिळू शकते, बापूंचे विचार हे विश्वरूपी आहेत. त्यामुळे त्याचा उपयोग नव्या पिढीला झाला पाहिजे. यासाठी हा प्रयत्न करत असल्याचे मत ज्ञानप्रकाश मोदाणी यांनी व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षांपासून मोदाणी बापूंचे विचार गावागावात पोहचावेत, यासाठी प्रयत्नशील आहेत. काही वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील काही गावांमध्ये पायी प्रवास करत, त्यांनी बापूंचे चित्र घराघरात लावून त्यांचे विचार आणि त्यांच्या विचारांमुळे जीवन कसे बदलू शकते, याबाबत माहिती सांगण्याचे काम केले.
हेही वाचा -कोरोनाबाधितांना अतिरिक्त बिल आकारणाऱ्या 14 खासगी रुग्णालयांना औरंगाबादमध्ये नोटीस
महात्मा गांधी यांच्यामुळे देशाला एक वेगळे महत्त्व आहे. जगात विश्वरूपी असलेले व्यक्ती आपल्या देशाचे आहेत. याचा अभिमान असून जगात असलेली ख्याती, देशाचे भविष्य देखील बदलू शकते. त्यामुळे त्यांच्या विचारांपासून नवी पिढी जास्तीत जास्त प्रेरित व्हावी. त्यांच्या विचारांवर देशाचा नावलौकिक आणखी वाढावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ज्ञानप्रकाश यांनी सांगितले.