औरंगाबाद: प्रियकरानेच प्रेयसीचे डोकं जमीनीवर आपटून हत्या केल्याची घटना महिन्याभरापूर्वी घडली होती. या घटनेत महिनाभरानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाला असल्याने आकस्मिक मृत्यूच्या नोंदीचे खूनाच्या गुन्ह्यात रुपांतर झाले आहे. याप्रकरणी सरकारतर्फे मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ यांनी १३ मार्चला दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कविता उर्फ जान्हवी सचिन वानखेडे (वेल्लूरे) असे मृताचे नाव आहे. तर अजमतखान उर्फ कयामत अनिसखान २७ (रा. शहाबाजार, चंपाचौक) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान मुकुंदवाडी परिसरात कविता उर्फ जान्हवी सचिन वानखेडे ही घटनेच्या चार ते पाच महिन्यांपूर्वी आरोपी अजमत खान ऊर्फ कयामत याच्यासोबत मुकुंदवाडी परिसरातील इच्छामनी हॉटेल पाठीमागील गल्लीत राहण्यासाठी आली होती. २ फेब्रुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आरोपी अजमत खान याने मृत कविता ऊर्फ जान्हवीला घराजवळील मैदानातील एका झाडाजवळ उचलून नेत बेदम मारहाण केली. मारहाणीत कविता ऊर्फ जान्हवी गंभीर जखमी झाली. हा प्रकार मयत कविताच्या मैत्रणीने पाहिला व याची माहिती पोलिसांना दिली. कविताला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतांना ६ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास कविताचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाल्याने आकस्मिक मृत्यूच्या नोंदीत बदल करून आरोपी विरूद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला आला.