औरंगाबाद- देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या 'रॉ'चा अधिकारी असल्याच्या थापा मारून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अभिजीत पानसरे, असे या तोतया रॉ अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी आयपीएस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र, तसेच अंतराळ संस्था नासा व पंतप्रधान कार्यालयाचे बनावट कागदपत्रे व कलर प्रिंटर असे अनेक साहित्य हस्तगत केली आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
अभिजीत पानसरे हा आपण आयपीएस अधिकारी असून रॉसाठी काम करत असल्याच्या थापा मारत होता. उच्चशिक्षित असलेला पानसरे इंग्रजीत बोलून समोरच्या व्यक्तीवर छाप पाडायचा. २०१६ मध्ये औरंगाबाद योथील रहिवासी शरद गवळी यांची पानसरेसोबत अॅड. नितीन भवर यांच्या मध्यस्थीने ओळख झाली होती. त्यानंतर पानसरे याने नासाच्यावतीने आपल्याला न्यूक्लीयर रिअॅक्टर तयार करण्याचे कंत्राट मिळाले असल्याचे सांगितले. त्यासाठी पानसरे याने गवळी यांना नासाची बनावट कागदपत्रे, बनावट धनादेश दाखवून ते खरी असल्याचे भासवले. त्यावेळी पानसरे याच्यासोबत दोन सहकारी महिला देखील होत्या.