औरंगाबाद - शहरात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता 10 जुलै ते 18 जुलै या दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. या बंदमध्ये उद्योग आणि व्यापार बंद राहणार असून नागरिकांनी बंदमध्ये स्वतःहून सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हधिकाऱ्यांनी केले.
औरंगाबाद शहरासह औद्योगिक वसाहतीत १० ते १८ जुलैदरम्यान जनता कर्फ्यू
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, शहरातील व्यापारी, उद्योजक आणि लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत हा बंद गरजेचा असण्यावर एकमत झाले. त्यानंतर नऊ दिवसांचा बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, शहरातील व्यापारी, उद्योजक आणि लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत हा बंद गरजेचा असण्यावर एकमत झाले. त्यानंतर नऊ दिवसांचा बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. संसर्ग कमी व्हावा यासाठी प्रशासनाने गेल्या सहा दिवसांपासून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा विशेष परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे आता 10 ते 18 जुलै दरम्यान कडक जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. हा बंद म्हणजे जनतेने जनतेसाठी लावलेली संचारबंदी असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. ४ जुलैपासून वाळूज भागात बंद पाळण्यात आला आहे. त्याठिकाणी देखील पुन्हा 10 ते 18 जुलै बंद पाळण्यात येणार आहे. यावेळी सर्व उद्योग बंद ठेवण्यात येतील. हा बंद यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्था सहभाग घेणार असून जवळपास सर्वच व्यापार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. बंदच्या काळात पोलीस दल कडकडीत बंद पाळला जावा यावर लक्ष ठेऊन असणार आहे. पूर्ण क्षमता वापरून आम्ही बंद यशस्वी करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.