औरंगाबाद -आषाढी एकादशीनिमित्त पैठण येथील गोदावरी नदीत लाखो भाविक आणि वारकऱ्यांनी स्नान करून नाथ समाधीचे दर्शन घेतले. ज्या भाविकांना पंढरपूर येथे जाता येत नाही, असे भाविक पैठण येथील नाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात. याठिकाणी औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांची गर्दी जास्त असते.
पैठणमध्ये आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी घेतले नाथाचे दर्शन - Vitthal
आषाढीनिमित्त आज भल्या पहाटेपासून वारकरी आणि भाविक विठुनामाचा जयघोष करत टाळ मृदंगाच्या गजर करत पैठणमध्ये नाथाचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते.
आषाढीनिमित्त आज भल्या पहाटेपासून वारकरी आणि भाविक विठुनामाचा जयघोष करत टाळ मृदंगाच्या गजर करत पैठणमध्ये दाखल झाले होते. त्यांनी गोदावरी नदी पात्रात स्नान करुन नाथ समाधीचे दर्शन घेतले. अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यामुळे चांगला पाऊस पडू दे,आणि बळीराजा आंनदीत राहू दे, असे साकडे नाथ महाराज चरणी घातले.
दरम्यान, गोदास्नानासाठी पहाटेपासून महिला पुरुष भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पैठणचे सर्व मुख्य रस्ते वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. नाथ मंदिराबाहेर नाथसमाधीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.