औरंगाबाद- मुस्लीम बांधव रमजान ईद दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करतात. पण यंदाच्या वर्षी, कोरोनाच्या संकटामुळे एकत्रित होणारी नमाज रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. आपल्या घरातच ईदची नमाज पठण करण्याच्या सूचना मुस्लीम धर्मगुरूंनी केल्या होत्या. त्यानुसार मुस्लीम बांधवांनी या प्रतिसादाला हाक देत घरीच नमाज पठण करत साध्या पद्धतीने ईद साजरी केली.
औरंगाबादेत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने, लॉकडाऊनचे कडक निर्बंध पाळले जात आहेत. यावर्षी ईदच्या खरेदीवर त्याचा परिणाम दिसून आला. यावर्षी नवीन कपडे आणि इतर साहित्यांची खरेदी मुस्लिम बांधवांना करता आली नाही. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करत यावर्षीची ईद साजरी करण्यात आली.
ईदच्या काळात हातावर पोट असलेल्या मुस्लीम बांधवांच्या घरातही ईद साजरी व्हावी, याकरिता राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला. शिवसेनेच्या वतीने आमदार डॉ. अंबादास दानवे आणि युवासेनेचे अक्षय खेडकर यांनी मुस्लिम बांधवांना धान्य वाटप केले. तर रोटी बँक या संस्थचे अध्यक्ष युसूफ मुकाती यांनी शिरकुर्माचे साहित्य आणि तांदूळ वाटप केले. यामुळे गरीबांना दिलासा मिळाला.
विशेष म्हणजे, हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदींसाठी कारागृहातच नमाज पठण अदा करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी नऊच्या सुमारास कारागृहात मुस्लीम बंदींनी नमाज पठण करत ईद साजरी केली.