औरंगाबाद -शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे पोलीस कर्मचारी उस्मानपुरा सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यरत होते. शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी कोरोनामुळे दगावल्याची ही पहिलीच घटना आहे.
बालाजी नगर येथील रहिवासी असलेले 51 वर्षीय कर्मचारी हे तीन दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. 9 जुलैला न्युमोनियाच्या लक्षणानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात होती. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. 11 जुलैला सकाळी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर दुपारी त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी आहे. या घटनेने पोलीस दलासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.